Monday, 20 May 2019

आंतरजातीय विवाह हाच रामबाण उपाय...

आंतरजातीय विवाह हाच रामबाण उपाय...

देशातील सद्य परिस्थिती बघता समाजातील जातीयतेची दरी अजूनही रुंद होत आहे. दिवसेंदिवस जातिजातीचे क्लेष वाढतच आहेत. सद्या चाललेल आरक्षण आणि अट्रासिटीच राजकारण जातींचे प्रश्न सोडवत नसुन वाढवतच आहे. स्वातंत्र्यानंतर साठ वर्ष उलटूनही भारतीय समाज एकमेकांशी भांडतच आहे तर आता याला एकमेव पर्याय शिल्लक काहीला आहे, आंतरजातीय विवाह. हि जातीयता नाहीशी करण्यासाठी आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्नांना प्रोत्साहन दिले पाहिजे. अशा लग्नांमुळे दोन परंपरा-दोन संस्कृती एकत्र येतात.

जातींच्या भिंती पाडण्यासाठी आवश्‍यक असलेल्या रोटी-बेटींच्या होऊ घातलेल्या व्यवहारांबाबत सर्वच समाजांनी सहृदयता दाखवावी आणि जातीय जाणिवा बोथट करत त्यांना आंतरजातीय विवाहांसाठी प्रवृत्त करावे... जातीयता नष्ट करण्यासाठीचा रामबाण उपाय असलेल्या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन द्यायला हवे...

आंतरजातीय विवाह हा जातीयता गाडण्यासाठीचा रामबाण उपाय असल्याचे मानले जाते. हिंदुत्ववाद्यांच्या गळ्यातले ताईत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही त्याचा पुरस्कार केला आहे. दोन जातींमध्ये विवाह झाला तर केवळ दोन कुटुंबे एकत्र येत नाहीत, तर दोन जाती-दोन परंपरा-दोन संस्कृती एकत्र येतात. त्यांच्या मुलांना वडलांची जात मिळत असली तरी सांस्कृतिकरित्या ते दोन जातींचे होतात. हीच परंपरा पुढे गेली, की एक जात उरत नाही. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये कोणत्या जातींमध्ये किती आंतरजातीय विवाह झाले, याची आकडेवारी तपासली पाहिजे. ज्या जातींमध्ये हे प्रमाण वाढत असेल त्या जाती काळानुरूप, पुरोगामी विचारांशी सुसंगत वागत असल्याचे लक्षात येईल. अर्थात ज्या जातींमध्ये हे प्रमाण कमी आहे, त्या जातींवर उगाचच टीका करणे, त्यांना प्रतिगामित्वाची दूषणे देणे चुकीचे ठरेल. आतापर्यंतच्या रूढी, मनात विचार असूनही ते प्रत्यक्षात उतरवण्यात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी यांमुळे त्यांना आंतरजातीय विवाहांपासून दूर राहणे भाग पडले असेल. मात्र आता तरी जाणीवपूर्वक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना चालना देण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. कथित सवर्ण असलेल्या दोन जातींमधील विवाहांपासून सुरवात करून कथित सवर्ण आणि कथित मागास यांच्या विवाहांना प्रोत्साहन देणे योग्य ठरेल.

गेल्या काही दशकांत सुरू झालेल्या आंतरजातीय विवाहांच्या या प्रक्रियेला आपण जाणीवपूर्वक गती देऊ शकलो, तर जातिपातींत विभागला गेलेला आणि त्यामुळे खरी प्रगती करण्यात अडथळे येत असलेला भारतवर्षांतला समाज एक होईल. परिणामी साने गुरूजींना पडलेले "बलसागर भारत होवो...'चे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पडलेले समानतेची तत्त्वे पाळणाऱ्या देशाचे स्वप्न सत्यात येईल.

No comments:

Post a Comment

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...