Thursday, 20 June 2019

भिक्खू कसा असावा? भिक्खू कडून आपल्याला काय अपेक्षा आहेत

१. भिक्खू कडून आपल्याला काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूना सांगितले ते असे.
२. जो कोणी चित्तमल धूवून टाकल्याशिवाय, त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काषायवस्त्र धारण करण्याची इच्छा करतो, तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही.
३. परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळावयाला शिकला आहे तोच खरोखर काषापवस्त्र धारण करण्यास योग्य आहे.
४. जो मनुष्य दुस-याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही.
५. ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपण जगात परिभ्रमण करतो, तोच खरोखर भिक्खू होय.
६. सामान्यजनांना अप्राप्य असे मुक्तिसुख, विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनांचा ( आस्रवाचा ) क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते, असे निश्चितपणे म्हणता येईल.
७. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूचे भाषण मधुर असते.
८. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममाण असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून होणार नाही.
९. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये. दुस-याला लाभले – त्याची स्पृहा करू नये. दुस-याचा मत्सर करू नये, जो भिक्खू दुस-याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही.
१०. अल्पच का होईना, परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अव्हेर करीत नाही, जो शुद्धजीवी आहे, प्रमादरहित आहे अशाची देवसुद्धा(विद्वान पुरुष) प्रशंसा करतात.
११. जो आपले नामरूप म्हणजेच अापण असे समजत नाही आणि जी नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे.
१२. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्धशासनात प्रसन्न असतो तो वासनाच्या ( आस्रव ) क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतिपद – निबाण प्राप्त करतो.
१३. हे भिक्खू , तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल, राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाणील.
१४. पाच बंधनांना तोडून टाकावे. पाच बंधनांचा त्याग करावा. पाच बंधनांवर मात करावी. पाच बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खुला ओघतीर्ण म्हणतात.
१५. हे भिक्खू , ध्यान कर, प्रमादात राहू नको. आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस.
१६. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही. ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही, ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वानाच्या जवळ आहे.
१७. ज्या भिक्खने एकान्तवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो.
१८. प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माचे घालून दिलेले निर्बंधांचे ( प्रतिमोक्षाचे ) पालन करणे, ज्यांचे जीवन शुद्ध आहे, जे अलस्यरहित आहेत अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो.
१९. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करील.
२०. स्वत:ला स्वत:च जागे कर, स्वत:च स्वत:ची परीक्षा कर असा आत्म रक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू , तू सुखाने राहशील.
२१. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे. तो स्वत:च आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे.
२२. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो अविकाराचे भय मानतो, आपले लहानमोठे बंध जाळून संचार करीत असतो.
२३. जो भिक्खू चितनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो. तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही, तो सदैव निव्वाण सान्निध्य अनुभवतो.
२४. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात.
२५. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस धम्माचे ध्यान संघावर एकाग्र झालेले असतात.
२६. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात.
२७. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्व शरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात.
२८. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते.
२९. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात. त्यांचे मन रात्रंदिवस चितनात आनंद मानते.
३० संसारत्याग बिकट आहे. संसारोपभोग बिकट आहे. विहारवास बिकट आहे. गृहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर समानतेने सेवणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणा-या भिक्खुसमोर दुःखच वाढून ठेवलेले आहे.
३१. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो.


संदर्भ: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
लेखक:डॉ.भीमराव रामजी आंबेडकर

Www.Dhammachya.com

No comments:

Post a Comment

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...