भगवान बुद्ध आणि अनाथपिंडक
भगवान बुद्धांच्या काळात श्रावस्तीला सुदत्त नावाचा एक कोषाध्यक्ष राहत असे. गरिबांना मुक्त हस्ते दान देत असल्यामुळे त्याला संपूर्ण राज्यात अनाथपिंडक म्हणून ओळखले जात असे.
तथागत राजगृह येते विहार करीत असताना तो आपल्या कामानिमित्त राजगृह गेला असता त्याला कळले कि तथागत राजगृहात आले आहेत. तो तथागत ज्या ठिकाणी होते तिथे गेला.
तथागतांनी त्याला उचित धर्मोपदेश केला. शेवटी तो तथागतांना म्हणाला " मी जाणू इच्छितो कि मी आपली संपत्ती , आपले घर , आणि आपला उद्योग व्यवसाय यांचा त्याग करून आपल्या धर्म जीवनाच्या सुख प्राप्ती करीता गृहत्याग करून बेघर होणे माझ्याकरता हे उचित आहे काय ? "
तथागत म्हणाले म्हणाले " जो जो व्यक्ती श्रेष्ठ अष्टांगिक मार्गाचा पथिक आहे त्या प्रत्येक व्यक्तीस धर्म जीवनाचे सुख प्राप्त आहे. परंतु जो संपत्तीला आसक्त होऊन चिकटून राहिलेला आहे , त्याचे हेच उत्तम मंगल आहे कि त्याने आपले हृदय धनाच्या आसक्तीनें विषारी न बनविता त्या धनाचा त्याने उचित उपयोग करणे, असा व्यक्ती आपल्या बांधवांसाठी एक वरदान आहे."
" तथागत तुम्हाला सांगतात कि तुम्ही गृहस्तीच राहा. आपल्या उद्योग धंद्यात कारभारात अप्रामादपूर्वक कार्यरत राहा. मनुष्याचे जीवन, ऐश्वर्य आणि अधिकार हे मनुष्यास दास बनवीत नाहीत तर जो त्या धनाप्रती आसक्त आहे ती आसक्ती त्यास गुलाम बनविते. भिक्कू झाल्यानंतर आरामदायी जीवन व्यतीत करता येईल या करीता जो संसार त्याग करतो त्यास कोणताच लाभ होत नाही. कारण आळसाचे जीवन हे घृणित जीवन आहे आणि शक्तीचा अभाव हे स्पृहणीय नाही. जो अंतःप्रेरणा नसेल तोपर्यंत तथागतांचा धम्म कोणासही प्रवज्जीत होण्यास, संसाराचा त्याग करण्यास सांगत नाही. तथागतांचा धम्म प्रत्येकाकडून हीच मागणी करतो कि त्यांनी आत्मवादी दृष्टीतून मुक्त व्हावे. त्यांचे मन परिशुद्ध असावे. त्यास काम-भोगादि यांची तृष्णा नसावी. आणि त्यांनी श्रेष्ठ धम्म जीवन व्यतीत करावे.
" मनुष्याचा कोणताही व्यवसाय असेल, तो शिल्पकार असेल, किंवा व्यापारी असेल, सरकारी नोकरी करीत असेल, किंवा संसार त्याग करून ध्यान भावना या मध्ये व्यग्र असेल, त्यांनी आपले कार्य पूर्ण मनापासून केले पाहिजे, त्यात परिश्रमी आणि उत्साही राहिले पाहिजे. जसे कमल पाण्यात असून सुद्धा पाण्यापासून अस्पर्शित राहते तसे कमळ पुष्प प्रमाने राहिले पाहिजे. जीवन संघर्षात त्याने आपल्या मनात ईर्षा व घृणा यांना स्थान देता कामा नये. संसारात राहून देखील जर का ते स्वार्थपूर्ण जीवन न जगता इतरांच्या कल्याणा करीता जीवन जगता असतील तर या बाबतीत किंचितही संदेह असणार नाही कि त्यांचे मन आनंद , शांती आणि सुख यांनी भरून जाईल. "
अनाथपिंडकास वाटले हाच सत्य धर्माचा मार्ग आहे. आणि त्याने तथागताच्या चरणावर नतमस्तक होऊन आजन्म तथागताच्या धम्माचा शरणागत उपासक राहण्याचे वचन दिले.
संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म.