Tuesday, 19 December 2017

बाबासाहेबांचे रमाबाईस पत्र

                         C/o henry s. King & co.
                                            At pall mall
                                                   London
                                      25th Nov. 1921
प्रिय रामू, नमस्ते.
पत्र पोचले. गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटले. नशिबाचा ठेवा. त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही.
तुझा अभ्यास चालला आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. पैशा-संबंधाने तजवीज करत आहे. मी अन्नास मोताद झालो आहे. तेव्हा मजजवळ पाठविण्यास काही नाही. तरीपण तुमचा बंदोबस्त मी करीत आहे. वेळ जर लागला आणि तुझे पैसे जर संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरुन देईन. यशवंत व मुकुंद याचे शिक्षण कसे चालले आहे? काही कळविले नाही.
माझी प्रकृती ठीक आहे. काही चिंता नसावी.  अभ्यास काही संपला नाही. जून महीन्यात येणे होईल असे दिसत नाही. पुढे कळविन.
सखु व मंजुळा यांच्यासंबंधी काही कळाले नाही. तुला पैसे पोहचल्यानंतर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईस एक एक (प्रत्येकी) लुगडे घेणे.
                                                  सर्वांस कुशल,
                                                      भिमराव
- शंकरची काय हालहवाल? गजरा कशी आहे?

Sunday, 26 November 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : बडोद्यातील एक प्रसंग

१३ अॉक्टोबर १९३५ रोजी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. अस्पृश्यतेने तोवर बाबासाहेबांचे अंतकरण तिळतिळ तुडवले होते. असे खुप प्रसंग होते ज्यांनी बाबासाहेबांना धर्मांतराची घोषणा करण्यास प्रवृत्त केले होते. त्यातीलच एका प्रसंगाबाबत बाबासाहेब येवल्याच्या परिषदेत सांगतात -

"बडोदे सरकारच्या स्कॉलरशिपा मिळाल्यावर मी विलायतेला जाऊन उच्च शिक्षण घेतले. तेथुन परत आल्यावर स्कॉलरशिपांच्या अटीप्रमाणे मला बडोदे संस्थानात नोकरी करणे भाग होते. बडोद्यात राहायला मला एकही घर मिळेना. हिंदु किंवा मुसलमान कोणीच राहावयास जागा देईनात. शेवटी एका पारशी धर्मशाळेत पार्शी म्हणुन राहण्याचे ठरवले. विलायतेहुन परत आल्यावर मी दिसायला रुबाबदार व गोरा दिसत होतो. शेवटी मी एदलजी सोराबजी असे पार्शी नाव धारण करुन राहीलो. रोजी दोन रुपये घेऊन राहावयास जागा देण्याचे धर्मशाळेच्या रखलालदाराने कबुल केले. यापुर्वीच श्रिमंत महाराज सरकारने बडोद्यास एक शिकलेले महार पोर आणले आहे, ही कुणकुण लोकांना कळली होती. माझे पार्शी म्हणुन गुप्तपणे धर्मशाळेत राहणे वगैरे गोष्टी लोकांना शंका येण्यास कारणीभुत होऊन माझ्या गुपीपणाचा स्फोट झाला. धर्मशाळेत राहाणारा मीच तो 'महार' हे तेथील पार्शी लोकांना कळले. दुसरे दिवशी मी जेवन वगैरे करुन ऑफिसला जाण्याकरता निघालो असताना पंधरा-विस पारशी हातात काठ्या घेऊन मला ठार करण्याकरता तिथे आले. त्यानी प्रथम 'तु कोण आहेस?' असे विचारले. मी फक्त 'हिंदु' आहे असे उत्तर दिले. परंतु त्यांचे या उत्तराने समाधान झाले नाही. त्यांनी हमरीतुमरीवर येऊन जागा ताबडतोब सोडण्यास सांगितले. त्यावेळी माझ्या मनोधैर्याचे मला विलक्षण पाठबळ मिळाले. मी त्याच्याजवळ निर्भयपणे आठ तासांची मुदत मागितली. व ती त्यांनी दिली. मी सबंध दिवस राहावयास जागा मिळवण्याचा कसुन प्रयत्न केला. परंतु मला कुठेच जागा मिळेना. कित्येक मित्रांकडे गेलो. त्यांनी निरनिराळी कारणे सांगून मला वाटेला लावले. मी शेवटी इतका कंटाळलो की, आता पुढे काय करावे हेच मला कळेना. मी एका ठिकाणी खाली बसलो. माझे मन उद्विग्न बनले व डोळ्यातून सारखा अश्रूप्रवाह वाहू लागला. अस्पृश्यतेच्या भडाग्नीने माझे अंतःकरण होरपळून निघाले होते. शेवटी अगदीच नाइलाज झाल्यावर मला बडोद्याची नोकरी सोडुन रात्रीच्या गाडीने मुंबईस यावे लागले..."

संदर्भ : डॉ. आंबेडकर चरीत्र : खंड १ - चां. भ. खैरमोडे.

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...